Header Ads Widget

बिबट्याच्या पिल्लावर अंतिम संस्कार


राजापुरातील जानशीत आढळले बिबट्याचं मृत पिल्लू

वनविभागाकडून बिबट्याच्या पिल्लावर अंत्यसंस्कार

- संदीप शेमणकर

राजापूर : तालुक्यातील जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी महेश पटवर्धन यांच्या मालकीच्या कम्पाऊंडच्या बाजूला रस्त्यालगत बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. वनविभागाकडून या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जानशी रस्ता येथील कातळसडा या ठिकाणी रस्त्यालगत बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलीस पाटील राजेंद्र कृष्णा तांबे यांनी परिमंडळ वनअधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यांनंतर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर आणि रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. बिबट्याचा बछडा हा रस्त्याच्याकडेला मृत आवस्थेत पडला होता. मृत बिबट्या हा मादी असून त्याचे वय साधारण तीन महिने असल्याचे वनविभागाने सांगितले.  

बिबट्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी आणि वनअधिकारी यांनी केली. पशुवैद्यकीय राजापूर यांच्यामार्पत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी  बछडा हा उपासमारीमुळे मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बछड्यास लाकडाची चिता रचून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक राजापूर विक्रम पुंभार आणि रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, गणेश गुरव, निलेश म्हादये उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोलफी क्रमांक 1926  किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments