Header Ads Widget

गावाचा विकास ग्रामपंचायतीच्या हाती-पाटील

 

गावाचा विकास ग्रामपंचायतीच्या हाती-पाटील

गावचा विकास आमदार, खासदार नव्हे 
तर ग्रामपंचायत करू शकते - भास्करराव पेरे-पाटील

 - संदीप शेमणकर

राजापूर : स्वातंत्र्यानंतर ७ हजार आमदार, खासदार झाले. त्यांनी आपापल्या  गावचा विकास किती केला, गावचा विकास आमदार, खासदार नव्हे तर ग्रामपंचायत करू शकते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रामपंचायतीला दिलेला अधिकार सर्वोच्च न्यायालयसुद्धा रद्द करू शकत नाही. मात्र, आपला अधिकार कसा वापरायचा याचा अभ्यास केला पाहिजे, असे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी मिळंद येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.

जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सुहासभाई आयरे यांचा सपत्नी नागरी सत्कार आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील हस्ते करण्यात आला. सुहासभाई आयरे यांना फुले पगडी , मानपत्र तर त्यांच्या पत्नी सुनीता आयरे यांना नायब तहसीलदार कवयित्री दीपाली पंडित यांच्या हस्ते पैठणी साडी देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ, ज्येष्ठ कार्यकर्ते जयंद्र रावराणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहासभाई आयरे नागरी सत्कार समिती अध्यक्ष गजानन गुरव होते.

 शासनाच्या धोरणावर बोलताना भास्करराव पेरे-पाटील म्हणाले,‌  माणसाचे आयुष्य दिवसे दिवस कमी होत आहे. सध्या ७० वर्ष सरासरी आयुर्मान असताना शासनने ७५ वर्षांनंतर एसटी, आरोग्य योजना मोफत सेवा केली आहे. आज विद्यार्थ्यांना सवलतीची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वयोवृद्ध व्यक्ती सरकारी संपत्ती आहे तेव्हा तिची काळजी ग्रामपंचायतने घेतली पाहिजे. नोकरीसाठी नव्हे तर समाजात वावरण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. याचा विचार करून मुली आणि मुलांना शिक्षण दिले पाहिजे. ग्रामपंचायत मध्ये विवाह,जन्म नोंद, मृत्यू नोंद वेळेत करावी यासाठी आपण जागृत राहावे. विवाह नोंदणी मुळे बालविवाह रोखण्यासाठी मदत होऊ शकते. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी एका विचारांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सुहासभाई आयरे यांच्या कार्याचा गौरव करून सुहासभाई आयरे यांच्या पत्नी सुनीता यांनी दिलेल्या साथीमुळे सुहास आयरे नागरी सत्कार करण्यापर्यंत मजल मारू शकला तर नायब तहसीलदार कवयित्री दीपाली पंडित यांनी आपल्या भाषणात, सुहासभाई आयरे यांच्या नागरी सत्कार गौरव विशेष अंकात कविता लिहिण्याचे पत्रकार शरद मोरे यांनी सांगितले तेव्हा मी क्षणाचा विचार न करता दोन कविता आणि एक अभंग लिहिला. माझ्या अभंग रचनेला मुखपृष्ठावर स्थान मिळाले. मुखपृष्ठावरील अभंग आणि सुहासभाई आयरे यांच्याकडे बघितले की मी केलेली रचना किती योग्य आहे हे स्पष्ट होते. विविध क्षेत्रात वावरताना प्रत्येकाचा कमी ज्यास्त प्रमाणात सत्कार होतो. मात्र नागरी सत्कार होणे प्रत्येकाच्या नशिबी नसते, ते भाग्य सुहासभाईंना मिळाले असे त्यांनी सांगितले. श्री विठ्ठु महाकाली देवस्थानचे मानकरी, वैभववाडीतील शैक्षणिक चळवळीत ज्येष्ठ नेते जयंद्र रावराणे यांनी आपल्या भाषणात, ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था चालवणे किती अवघड असते हे मी तीन संस्था चालवताना अनुभवले आहे. आमच्या साडे १३ गावांपैकी मिळंद हे आमचेच गाव आहे. त्यामुळे सुहासभाई आयरे आमचे आहेत. एक सच्चा मार्गदर्शक म्हणून त्यांचा उल्लेख होत आहे. नागरी सत्कार होण्याबरोबर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आमचं योगदान देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहासभाई आयरे नागरी सत्कार समिती कार्याध्यक्ष शरद मोरे यांनी करताना जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांचा नामोल्लेख करून त्यांचा गौरव केला. कै. आत्माराम आयरे विद्यालयाच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण उपलब्ध झाल्याने पंचक्रोशीत शिक्षणाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे आज वकील, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर यांची संख्या वाढलेली दिसत आहे. सुहासभाई आयरे यांच्या कार्यातून उतराई होण्यासाठी त्यांचा नागरी सत्कार करीत आहोत . कै.आत्माराम आयरे विद्यालयाला जमीन देणाऱ्यांच्या वारसदारांचा सत्कार भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन क्रीडापटू मोहन पाडावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव विश्वासराव, प्रकाश आयरे, मोतीराम मोरे, शैलेश आयरे, भास्कर गुरव आदींनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments