Header Ads Widget

neha sawant : डॉ. नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार


डॉ. नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार 


मुंबई - डॉ. नेहा सावंत यांना 'कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या पीएच. डी प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा मानाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 


मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंधासाठी पुरस्कार दिला जातो. यावर्षी सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंधासाठी डॉ. नेहा किशोर सावंत यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या 'कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास (प्रकाशित व अप्रकाशित)' या प्रबंधाची निवड करण्यात आली. मराठी भाषा दिनी पारितोषिक देऊन डॉ. नेहा सावंत यांना गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील कालिना संकुलात पार पडला. डॉ. नेहा सावंत यांनी 'कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. प्रबंधासाठी त्यांना डॉ. अलका मटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कै. प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक समितीने 2024-25 या वर्षातील पुरस्कारासाठी मराठीतील 'सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंध' म्हणून डॉ. नेहा किशोर सावंत यांच्या 'कुपारी बोलीतील साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या प्रबंधाची निवड केली. 


डॉ. नेहा सावंत हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व. अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात त्या 1991 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 34 वर्ष त्या विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. मराठी वाड्मय शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल, भविष्यात त्याचा उपयोग होईल या हेतूने अभ्यासक्रमाची आखणीही केली. त्यामुळे भवन्समध्ये मराठी भाषा विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. डॉ. नेहा सावंत यांच्या मनमिळावू स्वाभावामुळे भवन्स विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये त्या प्रसिद्ध तर आहेतच, मात्र विद्यार्थ्यांच्याही त्या आवडत्या अर्थात विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत. आजही अनेक विद्यार्थी आम्ही नेहा मॅडममुळे घडलो आहोत, असे अभिमानाने सांगतात. 


भवन्स विद्यालयात मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी डॉ. नेहा सावंत हिरीरीने पुढाकार घेतात. कोणताही कार्यक्रम असो किंवा अन्य कोणता उपक्रम, तो उत्तम झाला पाहिजे याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. डॉ. नेहा सावंत यांच्या प्रबंधाला पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. नेहा सावंत मॅडम यांचेही स्वप्न पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments