Header Ads Widget

टँकरमुक्त राजापुरात टँकर धावला


टँकरमुक्त राजापुरात अखेर टँकर धावला

८ गावातील 9 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

- संदीप शेमणकर

राजापूर : तालुक्यात कडाक्याचा उन्हाळा आणि भीषण पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षे टँकरमुक्त  राजापूर तालुक्यात अखेर पुन्हा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील आठ गावांतील नऊ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती राजापूर तालुका पंचायत समिती प्रशासनाने दिली. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असतानाच दुसरीकडे भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये मागणीनुसार टँकर धावत असतानाच राजापूर तालुका मात्र टँकरमुक्त राहिला होता. मात्र यावेळी तालुक्याच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतरही टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. मात्र प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला गेलेला नव्हता. अखेर प्रशासनाने दखल घेत राजापूर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर धाऊ लागले. दोन वर्षानंतर टँकर धावला असून खासगी टँकरद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस वाढत्या उष्म्यामध्ये नैसर्गिक जलस्त्रोत कमालीचे घटू लागले आहेत. त्यातून, राजापूर वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये गेल्या महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. राजापूर तालुक्यातून टँकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नव्हता. मात्र पाण्याची भीषणता वाढत असताना अखेर तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामध्ये ओणी-पाचल फाटा, ओझर-धनगरवाडी, वडवली-बौद्धवाडी, शिवाजीनगर, वडदहसोळ-हळदीची खांदवाडी, दोनिवडे-धनगरवाडी, कोंड्येतर्फ सौंदळ -बौद्धवाडी, तळगाव-तांबटवाडी, देवाचेगोठणे-पाटवाडी यांचा समावेश आहे. दिवसागणिकचा वाढता उष्मा आणि घटते जलस्त्रोत पाहता येत्या दोन दिवसांमध्ये तालुक्यामध्ये टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गेली दोन वर्ष तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नव्हता. टँकर मुक्त दाखविला जात होता. त्यामुळे राजापूर तालुका   टँकरमुक्त झालाय का, असे सवाल उपस्थित होते. अखेरच्या टप्प्याकडे उन्हाळा सरकत असताना राजापूर तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून यामध्ये आणखी गावे आणि वाड्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

राजापूर तालुक्यात  अनेक धरण प्रकल्प असूनदेखील तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे विदारक सत्य अधोरेखित  ठरले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून धरणे बांधण्यात आली, मात्र तरीही तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा वणवण फिरावे लागतेय हे वास्तव समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments