पतपेढी फोडली, सोनं लांबवलं
श्रमिक पतपेढीतील चोरीमुळे जैतापुरात खळबळ
जवळपास 200 तोळे सोने लांबवलं
-संदीप शेमणकर
राजापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित साखर यांच्या मिठगवाणे येथील शाखेमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या शाखेचा दरवाजा तोडून सोने ठेवलेला लॉकर गॅस कटरच्या मदतीने तोडून जवळपास २०० तोळे सोन्याची चोरी झाल्याची चर्चा आहे. तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआरसुद्धा गायब असल्याचे सांगितले जात आहे.
जैतापूर परिसरातील अनेक गरजू, गरीब लोकांचे सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात या पतपेढीमध्ये ठेवलेले असून चोरी झाल्याच्या बातमीमुळे परिसरात खळबळ आणि भीती व्यक्त होत आहे. श्रमिक पतपेढीची ही शाखा श्री देव अंजनेश्वर मंदिराजवळच्या परिसरात असून एका चाळ वजा खोलीमध्ये ही शाखा सुरू होती. याच इमारतीमध्ये बाजूला मिठगवाणे ग्रामपंचायत कार्यालयदेखील आहे. तर बाजूलाच पोस्ट ऑफिसही आहे.
पतपेढी असलेली इमारत जुनी आणि कौलारू असून सुरक्षित नसल्याची चर्चा आहे. या शाखेमध्ये दोन कर्मचारी कार्यरत असल्याचे समजते. श्रमिक पतपेढीचे मुख्य कार्यालय साखर कोंबे येथे असून मिठगवाणे येथे असलेली एकमेव शाखा आहे . मंगळवारी चोरी झाल्याचे निदर्शनास येतात तात्काळ सागरी पोलीस ठाणे नाटे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हेही प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले तर रत्नागिरी येथून श्वान पथकालही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यातून काही फारसे निष्पन्न झाले नसल्याची चर्चा असून पोलिसांनी पतपेढीचे सर्व कर्मचारी आणि सर्व संचालक यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे असे सांगण्यात आले असून नक्की किती रुपयाचा ऐवज लंपास केला गेला आहे याची माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. शाखेमध्ये अणसुरे, दांडे मिठगवाणे, माडबन, तुळसुंदे आदी गावातील ग्रामस्थांचे व्यवहार सुरू असतात
विमा कंपनीकडूनही पाहणी
ग्रामीण भागातील या पतपेढीवर चोराने डल्ला मारल्यामुळे लोकांच्या किमती ऐवजाची सुरक्षा आणि विश्वासहर्तेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी लवकरात लवकर या चोरीचा छडा लावावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होतेय. या पतपेढीची शाखा असलेल्या जागेची पाहणी करता आतमध्ये जवळपास चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेले आहेत, मात्र पतपेढी असलेली इमारत, खोली, तिचे दरवाजे आणि खिडक्या पाहता मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार चालणाऱ्या वित्तीय संस्थांनी सुरक्षेची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचेही बोलले जात आहे.
0 Comments