यश चव्हाणचं देदीप्यमान 'यश'
'केशभूषा' कौशल्य स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
रत्नागिरी - दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धा (इंडिया स्किल 2024) या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील यश दिनेश चव्हाण याला 'केशभूषा' या कौशल्यामध्ये संपूर्ण भारतातून सुवर्णपदक मिळाले आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासूनच त्याने वडिलांच्या सलूनमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.अगदी कमी वयातच यशने केशभूषेमधील विविध कौशल्य आत्मसात केली. दहावी झाल्यानंतर यशने मुंबई गाठली व उदय टक्के अकॅडमीमध्ये अॅडमिशन घेऊन दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. उदय टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली यश पहिल्यांदा 2021 मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये ( इंडिया स्किल 2021 ) सहभागी झाला.
इंडिया स्किल ही खेळाडूंमधील कौशल्य दाखवणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यामध्ये एकूण 75 कौशल्यांचा समावेश आहे. 2021 मध्ये पार पडलेल्या इंडिया स्किल स्पर्धेमध्ये यशने महाराष्ट्रामधून सुवर्णपदक तसेच प्रादेशिक स्तरावर रौप्य पदक पटकावले होते. राष्ट्रीय स्तरावर मेडालियन ऑफ एक्सेलन्स हे पदक मिळाले होते.
दोन वर्षं अपार मेहनत घेऊन नियमितपणे प्रॅक्टिस करून पुन्हा एकदा उदय टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ च्या इंडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये यश सहभागी झाला. संपूर्ण भारतामध्ये सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी यश सज्ज होत आहे. यशच्या या सर्व प्रवासामध्ये त्याचे वडील दिनेश चव्हाण व आई दीक्षा चव्हाण खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. तसेच उदय टक्के, अथर्व टक्के, हर्षदा टक्के, राज रिकिबे, प्रथमेश सावंत, शिरीन मर्चंट, मृणाल डोंगरे, महेश चाळके, अशोक शहा व उदय टक्के इन्स्टिट्यूटच्या पूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे.
0 Comments