Header Ads Widget

ईश्वरी मांडवेचं प्रेरणादायी यश


परिस्थितीवर मात करत ईश्वरीने मिळवलं यश 

राजापूर -  ज्या वयात वडिलांच्या खांद्यावर बसून हे रंगीबेरंगी जग पाहायचे असते आणि भविष्याची स्वप्न पाहायची असतात त्याच वयात वडिलांचे डोक्यावर भक्कमपणे असणारे छत हरपले. न कळत्या वयात वडील या जगात नसल्याची जाणीव पटकन स्वीकारणे कठीण असताना आलेल्या परिस्थिरीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवत यश संपादन करण्याची क्षमता, आपले ध्येय निश्चित करण्याची ताकद परिस्थितीवर मात करून राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडियम स्कूल, आंबेवाडीच्या इयत्ता दहावीत शिकत असलेल्या ईश्वरी मांडवे हिने दाखवली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेत ईश्वरीने ८९.२० टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक (संयुक्तरीत्या)  पटकावला आहे .

घरात अत्यंत हालखीची परिस्थिती त्यातच इयत्ता  सातवीमध्ये शिकत असताना ईश्वरीच्या वडिलांचे निधन झाले.  मदतीसाठी कुणीही नातेवाईक नाहीत, एकमेव आधार फक्त आईचा आणि दोन भावंडांचा.  ईश्वरीने लहान वयातही परिस्थिती परिस्थिती न करत बसता या कठीण परिस्थितीच्या छाताडावरच पाय रोवत सामोरे जाण्याचे धाडस दाखवले आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही तिच्या आईने तिच्यातली हुशारी ओळखून तिचे खासगी शाळेत सुरु असलेले शिक्षण तसेच पुढे सुरु ठेवले. शाळेच्या फीपासून वह्या पुस्तके यांचा खर्च काबाडकष्ट करून भागवला आणि आज या कष्टाचे चिज ईश्वरीने प्रथम क्रमांक मिळवून केले. ना कोणत्या खासगी शिकवण्या की ना इतर मदत, त्यातच आईला घरकामात मदत करत ईश्वरीने हे मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे . 

राजापूर शहरानजीक असलेले कोदवली हे ईश्वरीचे गाव. आई-वडिलांसह अन्य दोन भावंडे असे त्यांचे एकत्रित कुटुंब राहात होते. कुटुंबाचा कमावता  एकमेव आधार म्हणजे तिचे वडील होते.  मात्र ईश्वरी सातवीला शिकत असताना त्यांच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. आजारांनी ग्रस्त असलेल्या तिच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. मांडवे कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला. अशा वेळी आईचा आधार होता. ईश्वरीच्या आईनेही स्वतःला सावरले आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी ती सज्ज झाली. सर्व संकटांचा सामना करीत मांडवे कुटुंबांची वाटचाल सुरू होती. ईश्वरी घरकामात आईला मदत करीत होतीच. शिवाय अपार मेहनत घेऊन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तिने जोरदार अभ्यास केला होता. ईश्वरीच्या  प्रयत्नांना यश लाभले आणि ८९.२० टक्के गुण मिळवून इंग्लिश मीडियममधून तिने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या मोठ्या बहिणीने नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये यश मिळवले असून तिचा भाऊ आठवीमध्ये शिकत आहे. 

जाहिरात....ADVT

आपल्या यशाचे श्रेय तिने आपले कुटुंबीय, इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.  ईश्वरीही प्रामाणिक आणि शिस्तबद्ध विद्यार्थिनी असल्याची माहिती इंग्लिश मीडियमचे प्रिन्सिपल निलेश विश्राम पवार यांनी दिली. ईश्वरीला डॉक्टर व्हायचे आहे, तशी इच्छा तिने व्यक्त केली. तिचे स्वप्न साकार होण्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आडिवरे टाइम्सतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments