१ जूनपासून २ महिने मासेमारी बंद
यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस मनाई
संदीप शेमणकर
रत्नागिरी - मच्छीमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद आणि अन्य संबंधितांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे. या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छीमार खालील कारवाईस पात्र होतील.
१) पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील.
२) पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीन मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.
३) समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका १ जून २०२४ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच ३१ जुलै २०२४ वा त्यापूर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही.
४) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सूचना/ आदेश लागू राहतील.
५) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.
६) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.
0 Comments