Header Ads Widget

आठवडा बाजाराचे स्वैर स्वरुप थांबवा; राजापूर तालुका व्यापारी संघाची मागणी


आठवडा बाजाराचे स्वैर स्वरुप थांबवा; राजापूर तालुका व्यापारी संघाची मागणी

राजापूर - शहरातच काय तर गावागावात भरणारे आठवडा बाजार आता स्थानिक व्यापाऱ्यांना डोकेदुखी ठरू लागला असून शासनाने या आठवडा बाजाराचे स्वैर स्वरुप त्वरित थांबवावे, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने एका निवेदनाद्वारे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडे केली आहे. दिवसेंदिवस गावोगावी भरणाऱ्या आठवडा बाजाराला येणारे स्वैर स्वरुप स्थानिक व्यापाऱ्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळे स्थानिक व्यापारी मेटाकुटीला आला असल्याची खंत व्यापाऱ्यांनी किरण सामंत यांच्याकडे मांडली आहे. 


आमचा आठवडा बाजाराला विरोध नाही, मात्र अलीकडच्या काळात आठवडा बाजारात सुईपासून अगदी कपडे, स्टेशनरी, कटलरी, चप्पल, छत्री, स्टील भांडी अशा सर्वच वस्तू मिळू लागल्या आहेत. या आठवडा बाजारातील स्वैर व्यापारामुळे सर्वसामान्य ग्राहक फसवला जात असून शासनाचेही कराच्या रुपात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. स्थानिक व्यापारी आपले दुकान चालवताना स्थानिक प्राधिकरणाचे विविध कर, राज्य शासन व केंद्र शासन यांचे कर त्याचबरोबर आयकर असे विविध कर भरत असतो. स्थानिक व्यापाऱ्याला कामगार पगार, दुकानभाडे, लाईटबिल असे विविध खर्च स्थानिक व्यापाऱ्यांना भागवावे लागतात. मात्र आठवडा बाजारात येणारे व्यापारी यांना फक्त स्थानिक प्राधिकरणाची किरकोळ रक्कम भरुन व्यवसाय करता येतो . या विविध करांच्या बोजाखाली आता स्थानिक व्यापारी दबला असल्याची खंतही यावेळी व्यापाऱ्यांनी किरण सामंत यांच्याकडे व्यक्त केली. 
https://abhidnyanlifeeducation.blogspot.com/2019/03/blog-post_13.html

आठवडा बाजार ही संकल्पना निव्वळ शेतमालासाठी व नाशिवंत मालासाठी होती. त्याप्रमाणेच आताही आठवडा बाजार भरायला हवेत.  शेतकऱ्यांना आपला शेतमाल आठवडा बाजारात विकता यायला हवा, मात्र आता ही आठवडा बाजाराची संकल्पना पुसली जात आहे. आजच्या आठवडा बाजाराला स्वैर स्वरुप यायला लागले असल्याचे मत राजापुरातील व्यापाऱ्यांनी मांडले. आठवडा बाजारामुळे म्हणजेच आठवडा बाजारात सगळ्याच वस्तू मिळत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत ग्राहक येईनासा झाला आहे. स्थानिका व्यापारी हा फक्त वर्गणी हवी असली तरच हवा वाटतो. त्यामुळे आज स्थानिक व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असून भविष्यात जगायचे कसे, असा प्रश्न  व्यापाऱ्यांना पडू लागला असल्याची खंतही यावेळी व्यापाऱ्यांनी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडे मांडली.


आठवडा बाजाराच्या या स्वैर स्वरुपाला आळा घालण्यासाठी  आपण शासन स्तरावर प्रयत्न करुन व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली आहे. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाधक्ष राजेंद्र नवाळे, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, रमेश पोकळे, अनंत रानडे, विनोद पवार, कौशिक संसारे, विजय हिवाळकर, शार्दुल संसारे आदी व्यापारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments