Header Ads Widget

rajan salvi join shivsena : 'जेथे विचारांना वाळवी, तेथ कसे राहतील साळवी'


rajan salvi join shivsena 'जेथे विचारांना वाळवी, तेथ कसे राहतील साळवी'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा

राजन साळवींची शिंदेंच्या शिवसेनेशी 'निष्ठा'

साळवींनी शिवबंधन तोडलं, धनुष्यबाण धरला

ठाणे - ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही राजन साळवी ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहात स्वत:ला निष्ठावान मानत होते, मात्र गुरुवारी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते त्याचबरोबर राजन साळवी यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे उदय सामंत यांचे भाऊ आणि राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या विरोधात राजन साळवी यांनी 2024ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता.

राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. कोकणात उरलीसुरली ठाकरेंची शिवसेना संपली अशी टीकाही आता होऊ लागली आहे. इतकेच नव्हे तर अजून काही नेते आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. तर राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तरी विकासकामांवर फार मोठा फरक पडणार नाही, अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 

राजन साळवी काय म्हणाले ?

आनंद दिघे यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या जागेत शिवसेनेत प्रवेश केला हे माझे भाग्य आहे. शिवसेनेत प्रवेश करताना डोळ्यात अश्रू आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे जिल्हाप्रमुख झालो. त्याचबरोबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना मी सोबत जाऊ शकलो नाही याचे दु:ख होते, असेही साळवी म्हणाले. तसेच 2024 चा पराभव जिव्हारी लागला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्यासोबत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात योग्य तो सन्मान मिळावा, अशा भावनाही राजन साळवींनी व्यक्त केल्या.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय आश्वासन दिलं ?

राजन साळवी  शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चेमुळे किरण सामंत यांचं काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मागच्या तीन वर्षांत तुमच्याकडे धनुष्यबाण होता, मात्र तो काँग्रेसच्या खांद्याला लागला होता. आता ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे हात बळकट होतील त्या  त्या ठिकाणी सामंजस्यपणा दाखवला जाईल, त्याचबरोबर पूर्ण रत्नागिरी जिल्हा भगवामय करणार असल्याचेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून साळवींचं स्वागत

कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा एकदा आपल्या गुहेत परतला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींचे कौतुक करत स्वागत केले. राजन साळवी योग्य वेळी शिवसेनेत आले असते तर ते पुन्हा आमदार झाले असते. उदय सामंत आणि किरण सामंत हे राजन साळवी यांना शिवसेनेत या असे सारखे सांगत होते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या पक्षात विचारांना वाळवी लागली आहे त्या पक्षात कसे राहतील राजन साळवी, असे म्हणत शिंदे यांनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या हस्ते सत्कार केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा जळफळाट झाला, अशी टीकाही शिंदे यांनी केली. 





Post a Comment

0 Comments