![]() |
कसा होईल कोकणातील कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास ?
◆ सुहास खंडागळे
आमच्या कोकणातील कुणबी समाजातील काही जण निवडणुका आल्यावर आणि निवडणुका झाल्यावर कायम एक बोंब मारताना दिसतात...समाजाचा विकास होत नाही... मी म्हणतो कसा होईल समाजाचा विकास?
आधीच वर्चस्ववादी लोकांनी समाजात फूट पडण्यासाठी त्यांच्या सोयीची नेतृत्व समाजात उभी केली आहेत... जी नेतृत्व उभी केली आहेत त्या नेतृत्वांना सोंगट्यांप्रमाणे त्यांचे बॉस हे निवडणुकांच्या काळात हलवत असतात... या सोंगट्या त्यांच्या बॉसच्या इशाऱ्यावर त्यांचा प्रभाव असणाऱ्या भागात समाजाला चुकीची दिशा देण्याचे काम येन निवडणूक काळात करतात...
जर निवडणुकीच्या आधी समाजाचा ठेका घेतलेले काही स्वयंभू नेते आणि त्या त्या गावातील स्वार्थी गाव पुढारी शुल्लक आमिषा पोटी गावांची एकगठ्ठा मतदान प्रत्येक निवडणुकीत साध्या भोळ्या जनतेला वेठीस धरून करायला लावत असतील, तर डोंबल्याचा विकास होणार आहे का ?
पैसे घेऊन केलेल्या मतदानातून जेव्हा तुम्ही स्वतःला विकता, तेव्हा तुम्हाला विकत घेणारा ढुंकून सुद्धा पाहत नाही ही वस्तुस्थिती केव्हातरी स्वीकारणार आहात की नाही ? जो जिंकण्यासाठी पैसे देतोय... म्हणजेच एक प्रकारे निवडणूक प्रक्रियेशी फ्रॉड करतोय... असा माणूस तुमच्या समस्यांना कसा न्याय देईल ? हे कधी डोक्यात घुसणार आहे की नाही?
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
समजून घ्यायची आपली मानसिकताच नाही! स्वयंघोषित पुढारी म्हणून मिरवण्यात जो मोठेपणा मिळतो त्या मोठेपणाला छेद देण्याची आता गरज आहे...याबाबत समाजातील तरुणांची जबाबदारी मोठी आहे. खास करून शहरांमध्ये गेलेल्या तरुणांनी
समाजातील अशा स्वार्थी ढोंगी पुढार्यांना ओळखणे गरजेचे आहे.इतिहासातून आपण धडा घ्यायला हवा!
गावाचं एखादं सभामंडप, बोरवेल किंवा धार्मिक काम या भावनिक मुद्द्यावर निवडणुकीच्या काळात शिकलेली माणसं सुद्धा दुर्दैवाने स्वतःचं डोकं गहाण ठेवतात... त्या ठिकाणी देवाच्या नावाने होणाऱ्या राजकारणाला,फसव्या जातीच्या नावाने होणाऱ्या राजकारणाला आणि एक गठ्ठा मतदानाला सुशिक्षित तरुण सुद्धा विरोध करत नाहीत.याच ठिकाणी लबाड आणि नेत्यांच्या चेल्यांचे फावत!
किती दिवस हे चालणार आहे? जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत कोकणातल्या कुणबी समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही ही वस्तुस्थिती आता तरुणांनी स्वीकारायला हवी...
कुणबी समाजातील तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे... तुम्ही स्वतः राजकीय दृष्ट्या प्रगल्भ व्हा! चांगलं वाईट याची खातरजमा तुम्ही स्वतः करा! स्वार्थी मतलबी आणि ढोंगी समाज नेत्यांच्या नादाला लागू नका!
निवडणुकीच्या काळात उगवणारे नेते आणि कोणातरी नेत्याची सुपारी घेऊन आपल्याकडे एकगठ्ठा मतदानासाठी हातापाया जोडणारे त्यांचे चेले आपल्या समाजाचा विकास कधी करू शकत नाहीत... जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकशाही मूल्य, लोकशाहीतील हक्क अधिकारांची जाणीव आपण रुजवत नाहीत तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही!
- सुहास खंडागळे, संघटन प्रमुख
#गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा
.png)

0 Comments