Header Ads Widget

रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे उन्हाळी प्रदर्शन


रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे उन्हाळी प्रदर्शन

रत्नागिरी -  रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे पर्यटक, रत्नागिरीकरांसाठी टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित महिला बचत गट, महिला उद्योगिनींनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला दिमाखदार सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन जोशी फुड्सच्या संचालिका, उद्योजिका कांचन चांदोरकर यांनी केला.

उद्घाटनप्रसंगी जोशी फुड्सच्या संचालिका कांचन चांदोरकर म्हणाल्या की, महिला उद्योजिका या नेहमी घरसंसार सांभाळून उद्योगात कार्यरत असतात. आमच्या जोशी फुड्स उद्योगामध्येही ५० जणांचे कुटुंब आहे. त्याप्रमाणेच रत्नागिरी ग्राहक पेठचेही एक सुरेख कुटुंब जमले आहे. महिलांना उद्योग, व्यवसाय, काटकसर, धनसंचय करण्याची वेगळी दृष्टी असतेच. त्यामुळे महिला उद्योजिकांनी या उद्योजकीय कौशल्यांचा विकास करून नाव कमवावे.

व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा सुर्वे, संयोजिका प्राची शिंदे, उद्योजक सुहास ठाकुरदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते. पल्लवी तावडे यांनी सूत्रसंचालन केले. 

या वेळी सुहास ठाकुरदेसाई म्हणाले की, सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या प्राची शिंदे या महिला उद्योगिनींनीसाठी ग्राहक पेठेमार्फत प्रदर्शन आयोजित करतात. त्याला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. पर्यटक, रत्नागिरीकरांसाठी आयोजित या प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळू दे, असेही ते म्हणाले.

यावेळी उद्योजिका कीर्ती मोडक, कीर यांनी मनोगत व्यक्त करून ग्राहक पेठेतून महिला उद्योगिनींना सुवर्णसंधी मिळते, याबद्दल अनुभव सांगितले. या वेळी उद्योजिका स्वाती सोनार, भुवना महागावकर, शुभदा माळवदे यासुद्धा उपस्थित होत्या. गेली अनेक वर्षे महिला बचत गट, महिला उद्योगिनींचे संघटन, एकत्रीकरण करत असल्याचे प्राची शिंदे यांनी सांगितले. सकाळी ११.०० ते रात्री ८.३० या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. 

प्रदर्शनात कोकणी मेवा, खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, साड्या, कुर्तीज, ज्वेलरी, हॅन्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, ड्रेस मटेरिअल्स, गारमेंटस्, मसाले, आदींचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पर्यटक, रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राची शिंदे यांनी केले. या प्रदर्शनासाठी बहुमोल सहकार्य करणाऱ्या कौस्तुभ सावंत यांचे विशेष आभार मानले.

प्रदर्शनात  २४ मे रोजी दुपारी ३.३० वाजता फनी गेम्स, २५ मे रोजी दुपारी ४ वाजता आर्थिक उन्नतीसाठी योग्य गुंतवणूक कोठे करावी? यावर आर्थिक सल्लागार गुरुदत्त बागवे मार्गदर्शन करणार आहेत. तर २६ मे रोजी दुपारी ४ वाजता व्यवसाय वाढीच्या दृष्टीने डिजिटल मीडियाचा योग्य वापर यावर शिवांग साळवी मार्गदर्शन करणार आहेत.

Post a Comment

0 Comments