Paris Olympics 2024 IND beat AUS : भारताच्या हॉकी संघाने
ऑस्ट्रेलियाला पराभूत करत रचला इतिहास
ऐतिहासिक विजयासह ५२ वर्षांचा दुष्काळ संपवला
Paris Olympics 2024 IND beat AUS: भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक २०२४च्या गट टप्प्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३-२ अशा फरकाने पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय हॉकी संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Paris Olympic 2024 India beat Australia Hockey: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज म्हणजेच २ ऑगस्टला हॉकी सामना खेळवला गेला. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय हॉकी संघाने हा सामना जिंकला आहे. हा विजय भारतीय संघासाठी हॉकीमध्ये खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया हॉकीमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. हरमनचे दोन गोल आणि अभिषेकच्या एक गोलसह भारताने हा सामना ३-२ अशा फरकाने जिंकला. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत, पण या विजयाने भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. भारताकडून अभिषेकने एक आणि हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले, तर ऑस्ट्रेलियाकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्सने गोल केले. या सामन्यातील विजयासह भारतीय हॉकी संघ ब गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचे आता ५ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ ५ सामन्यांत ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Paris Olympic 2024: भारताच्या हॉकी संघाने रचला इतिहास
भारताने ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. टीम इंडियाने १९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. यासह, भारतीय संघ सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या शोधात मोठी कामगिरी करत आहे. आतापर्यंत त्यांना केवळ बेल्जियमविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. याशिवाय संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. भारताने ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेला न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने सुरुवात केली. त्यानंतर भारताने अर्जेंटिनाविरुद्ध सामना अनिर्णित राहिला. शेवटपर्यंत अर्जेंटिना १-० ने पुढे होती. १.४५ मिनिट बाकी असताना कर्णधार हरमनप्रीतने गोल करत सामना बरोबरीत आणला.
अर्जेंटिनाच्या सामन्यानंतर संघाने आयर्लंडचा पराभव केला. बेल्जियमच्या सामन्यातही भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला असला तरी अखेरच्या क्षणांमध्ये त्यांना सामना १-२ असा गमवावा लागला होता. तर आता संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामना जिंकला.
टीम इंडियाने घेतला बदला
दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स २०१० च्या फायनलमध्ये ८-० आणि बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलमध्ये ७-० अशा पराभवानंतर झालेल्या भारतीय हॉकी चाहत्यांच्या जखमा या विजयाने नक्कीच भरल्या असतील. या सामन्यापूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ पैकी फक्त ३ सामने जिंकले होते (१९६० रोम उपांत्यपूर्व फेरी, १९६४ टोकियो उपांत्य फेरी आणि १९७२ म्युनिक गट सामना) तर ऑस्ट्रेलियाने सहा जिंकले होते आणि दोन अनिर्णित राहिले होते.
source - www.loksatta.com
photo - sportworkmedia
0 Comments