कंटेनर अपघात, 1 ठार, 5 गंभीर जखमी
राजापूर गाडगीळवाडीजवळ भीषण अपघात
राजापूर - मुबई-गोवा महामार्गावर गाडगीळवाडी येथील बसथांब्यानजीक गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकने या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून १० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. सुदेश चंद्रकांत फाटक (४५) रा. शेढे फाटकवाडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. ट्रक पलटी झाल्याने डिझेल टाकी फुटून डिझेल आणि ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक वळवण्यात आली होती.
उतारावरून वेगाने घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पळापळ केल्याने बालंबाल वाचले. या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांसह अनेकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गोव्याकडू कोळसा भरून मुंबईकडे जाणारा हा चौदा चाकी मोठा ट्रक महामार्गावर गाडगीळवाडी येथील उतारावरून भरधाव वेगाने आला आणि हा अपघात झाला. यावेळी या ठिकाणी असलेल्या बस थांब्यावर काही प्रवासी व काही दुचाकीस्वार उभे होते. तर एक कारदेखील उभी होती.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये कारमधील विकास रघुनाथ पाडावे, रघुनाथ भगवान पाडावे, रामदास लक्ष्मण दळवी, श्रावणी रामदास दळवी (सर्व रा. कणेरी) यांचा समावेश आहे. तर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहिर धुळप (१३) रा. कोंढेतड याच्या डोक्याला दुखापत झाली. या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींध्ये ट्रक चालक अंबालाल श्रीरामजी बाट (४५) रा क्लीनर असलम खान, उदयपूर या दोघांसह उभ्या असलेल्या प्रवाशांमधील रेश्मा दिगंबर फाटक, शुभ्रा प्रफुल्ल फाटक रा. शेढे फाटकवाडी, सर्वेश उमेश सुर्वे (१८) रा. मुंबई सध्या रा. कोंढेतड यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोहनिश शिवदे, डॉ. हर्षानी बुरानी यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार केले.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, उपनिरीक्षक मोमीन शेख यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत केली आणि पंचनामा केला. तर स्थानिक ग्रामस्थांसह राजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेकांनी अपघातस्थळी आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. त्याचबरोबर अपघातस्थळी पोलिसांना सहकार्य केले. हा अपघात कसा झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला की कसा, याचा पोलीस तपास करत आहेत.
0 Comments