रुचिता नाईक यांची समाजकार्यात भरीव कामगिरी
संदीप शेमणकर
मुंबई - समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या नालासोपारा शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज जयश्री राजेमहाडिक चव्हाण यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे जीवनगौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थानने रुचिता नाईक यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राजेश्री जीवनगौरव २०२४ पुरस्कार प्रदान केला.
एक महिला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खूप काही करू शकते हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रुचिता नाईक. त्यांनी आपल्या विचारांतून व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक समाजसेवेची ज्योत प्रोज्योलित करुन आज ही ती अखंड पणे सुरुच ठेवली आहे. हजारो महिलांना मोफत शिवणकाम, मेहंदी, ब्युटीपार्लर, केक मेकिंग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले.
शेकडो दिव्यांग बांधवांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र, साहित्य व पेन्शन मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय. संजय गांधी योजनेमधून विधवा महिलांना दर महिना पेन्शन सुरू करून दिली. तहसीलदार कार्यालयातून गरीब गरजू नागरिकांना मोफत दाखले उपलब्ध करून देण्यात आले. शेकडो नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आली. शिवसेना कार्यालयात दर महिन्याला आधार कार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड नागरिकांचे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले.
महिलांवरील अत्याचार थांबवावेत यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. सोपारा सामान्य रुग्णालयातील रिक्त जागेवरील भरती व साहित्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिले. नालासोपारात दरवर्षी पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना शासनाकडून मदत मिळवुन दिली.
पाणीसमस्या , अनधिकृत बांधकाम, नैसर्गिक नाले, रस्त्यावरील खड्डे अनधिकृत मोबाईल टॉवर अशा अनेक समस्या शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी मार्गी लावल्या. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणही केले.बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे रुचिता नाईक यांनी सांगितलं.
या कार्यक्रमास नितीन औटी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज जयश्री राजेमहाडिक चव्हाण, अभिनेते सचिन गवळी, शेतीतज्ज्ञ मानसी पाटील, अभिनेत्री लेखा अटकर, सत्यवान रेडकर उपस्थित होते.
0 Comments